Thursday, January 10, 2008

देव देव्हाऱ्यात नाही...


कॉलेजला असतानाची गोष्ट. भर पावसाचे दिवस. कोकणात नेहेमीसारखाच तूफ़ान पाऊस. पूराच्या बातम्या. गावेच्या गावे पाण्याखाली बुडालेली.

शनिवार असल्याने मी जरा उघडीप पाहून मारूतीच्या देवळात जायला निघालो. स्कूटरला कीक मारतो इतक्यातशेजारच्या आजोबांची हाक आली.

"काय लिमये, कुठे चाललात?" (हे आजोबा एकदम कुजकट आहेत. हो.. माझ्यापेक्षाही....)

"काही नाही हो, जरा देवळात जाऊन येतो."

"आज भेटणार का तुम्हाला तुमचा देव? अहो तो गेला असेल दीनाघरी..."

"अं??" मी पुढचे काही बोलण्याआधी आजोबा स्टेअरींग वळवून घरात गुडूप.

माझी स्कूटर देवळाकडे चालली होती, आणि मनही आजोबांच्या बोलण्याने प्रवास करू लागलं.

देवळापाशी पोचलो. दर शनिवारी गजबजलेली ही जागा आज सामसूम होती. एक दोन तुरळक माणसंच दिसतहोती.

पावसामुळे पालापाचोळा आणि चिखल पसरलेला होता. देवळाच्या छपराची कौलं थोडी सरकल्यानं देवळातहीपाणी येउन सारं चिपचिपित झालं होतं.

मनात मगाचचेच विचार चालु. खरंच का आजही देव इथे बसला असेल? कोणाची तरी वाट बघत? कोणीतरीयेइल..देवळात साचलेलं पाणी पुसून काढील...अंगणातला चिखल, पालापाचोळा झाडून स्वच्छ करील...

माझ्यासारखा कोणीतरी येइल, ऊदबत्ती आणि नारळ दाखवील आणि आशिर्वाद मागील?

मग त्यांचं काय..जे आज पूराच्या पाण्याशी झुंजतायत? जे आज बेघर झालेत? ज्यांना आज खरंच देवाच्याआधाराची गरज आहे?

विचार चालु असतानाच मारूतीच्या मूर्तीकडे पाहिलं. मनातल्या विचारांचा व्हायचा तो परिणाम त्या बिचाऱ्याडोळ्यांवरही झाला. मारूतीची ती मूर्ती मला निर्जीव वाटू लागली. पक्की खात्री झाली की आज देव ह्या मूर्तीतनक्कीच नाही.

छ्या!!! आज खेप फ़ुकटच गेली. आता कुठे शोधायचे याला?

माझी स्कूटर पुन्हा घराकडे वळली.

खरंच. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नाही?

मी कशासाठी जातो देवाकडे? त्याला प्रसन्न करण्यासाठी.

त्याने काय होईल? तो आपली काळजी घेइल. संकटांपासून आपल्याला वाचवील.

पण माझ्यासारखे अनेक जण जातात देवाकडे. त्याला प्रसन्न करण्यासाठी.

म्हणजे देव त्यांची पण काळजी घेतो. त्यांनासुद्धा संकटातून वाचवतो.

आणि आज देवाचे अनेक भक्त संकटात आहेत. त्यांची घरेदारे बुडाली आहेत. खायला प्यायला काही नाही, पावसापासून वाचण्यासाठी डोक्यावर छत नाही.

म्हणजे आत्ता त्यांना जास्त गरज आहे त्याची... आत्ता तो त्यांच्याजवळच असेल... त्यांचे रक्षण करत... त्यांनासंकटातून बाहेर काढत असेल तो...



हो..म्हणजे मला त्याला भेटायचे असेल तर तिथेच जावं लागेल.

आत्ताच नाही, तर प्रत्येक वेळी देव कुणा ना कुणाच्या रक्षणासाठी धावून गेला असणार.

म्हणजे देवाला भेटण्याचा एकच मार्ग आहे तर...मलाही त्याच्या अशा भक्तांजवळ गेलं पाहिजे.

बस्स... विचार पक्का झाला. स्कूटर घराएवजी पंचायतीकडे वळवली. पुनर्वसनासाठी मदत म्हणून निधी गोळाकरत गावभर हिंडलो. त्या निधीतून जरूरी सामान
विकत घेऊन पंचायतीत पोचवलं.

घरी पोचायला रात्र झाली होती. तरीसुद्धा शेजारच्या आजोबांच्या घरी गेलो. आणि त्यांना बोललो..

"आजोबा, आजच मला खरा देव भेटला हो..."

मित्रांनो, तुम्ही सुद्धा विचार करून पहा, पहा तुम्हाला देव कधी भेटला आहे का ते.....

1 comment:

Anonymous said...
This comment has been removed by a blog administrator.